Source: http://www.agrowon.com/Agrowon/20101127/5421017091470515774.htm
ऊस समस्येवर शोधला गुऱ्हाळ व्यवसायातून उपाय
जितेंद्र गावंडे
Saturday, November 27, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: agro special
ऊस लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्यांसह गूळ तयार करणाऱ्या गुऱ्हाळांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तुलनेत खानदेशात साखर कारखाने जेमतेम सुरू आहेत आणि गुऱ्हाळांची संख्या म्हणाल, तर अगदीच बोटांवर मोजण्याइतकी आहे. असे उदासीन वातावरण सर्वदूर असताना, जळगाव जिल्ह्यातील निंभोरा (ता. भडगाव) येथील हिरामण पाटील यांनी इतर शेतकऱ्यांप्रमाणे वेळेवर ऊस तुटला नाही म्हणून फडाला आग लावली नाही; तर त्याचा सदुपयोग करण्यासाठी गुऱ्हाळ सुरू केले...गिरणा नदीच्या काठावर वसलेला भडगाव तालुका (जि. जळगाव) केळी, ऊस, कपाशी या पिकांसाठी तसा पूर्वापार प्रसिद्ध राहिला आहे. आजही तेथील शेतकरी बदलत्या हवामानाचा सामना करीत केळीसह कापसाचे भरघोस उत्पादन घेताना दिसतात. दुर्दैवाने चाळीसगावचा बेलगंगा साखर कारखाना बंद पडल्याने, ऊस लागवडीखालील क्षेत्र झपाट्याने घटले आहे. पूर्वी, जवळपास प्रत्येक शेतात कमी-अधिक प्रमाणात ऊस लागवड केली जात असे. आज कित्येक किलोमीटर अंतर चालत गेल्यावर कुठे उसाचे शेत नजरेस पडते अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी शेतातून उसाचे पीक जवळपास हद्दपारच करून टाकले आहे. अशा या परिस्थितीत निंभोरा येथील हिरामण पाटील यांच्यासारख्या सर्वसाधारण शेतकऱ्याने या भागात सुरू केलेले उसाचे गुऱ्हाळ म्हणजे वाळवंटात विहीर खोदण्याचाच जणू प्रकार आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यात निंभोरा हे गाव खूपच आडवळणावरचे आहे. खाचखळग्यांतून वाट काढीत कजगावहून कनाशीमार्गे भडगावला जाताना पाटील यांचा "शाकंभरी गूळ प्रकल्प' नजरेस पडतो.
गरजेने दिली गुऱ्हाळाची प्रेरणा
साधारण 2004 ची गोष्ट आहे. मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड झाल्यामुळे साखर कारखाने आपल्या कार्यक्षेत्रातील उसाची तोड वेळेवर करू शकले नाहीत. अनेक शेतकऱ्यांना उभ्या उसात गुरे चारावी लागली. काहींनी उद्विग्न होऊन स्वतःच्या हाताने उसाच्या शेताला आगकाडी लावून ते पेटवून देण्याचा दुर्दैवी प्रकारही घडला. अशा परिस्थितीत हिरामण पाटील यांनी इतर शेतकऱ्यांप्रमाणे डोक्यात राग घालून न घेता उपलब्ध उसाचा सदुपयोग करण्याच्या उद्देशाने सकारात्मक विचार सुरू केला. तसा नुसता विचार केला नाही, तर त्या दिशेने तत्परतेने पावलेसुद्धा उचलली. परिसरातील एका बंद पडलेल्या गुऱ्हाळाचे जुने साहित्य विकत घेतले.
स्वतः गूळ तयार करण्याचे ज्ञान अवगत केले. प्रत्यक्षात त्या माध्यमातून न तुटलेल्या उसाची व्यवस्थित विल्हेवाट लावणे शक्य झाले. फार नफा झाला नाही; परंतु होणारे नुकसान टाळता आले. शिवाय, शेतीपूरक नव्या जोडधंद्याचा अनुभव मिळाला, ज्यामुळे श्री. पाटील यांचा उत्साह अजूनच द्विगुणित झाला. स्वतःच्या शेतात लागवड होणारा 17 - 18 एकर क्षेत्रातील ऊस साखर कारखान्यांना न देता, त्यापासून गूळ तयार करण्याचा त्यांनी निर्धारच केला.
तीन वर्षांत फेडले दहा लाखांचे कर्ज
सुरवातीची तीन वर्षे जुन्या साहित्यावर गुऱ्हाळ चालविल्यानंतर श्री. पाटील यांनी व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरविले, त्यासाठी आवश्यक असलेल्या दहा लाख रुपयांच्या भागभांडवलासाठी आपला मुलगा महेंद्रच्या नावाने खादी ग्रामोद्योगकडे रीतसर कर्जप्रस्ताव सादर केला. बॅंक ऑफ बडोदाच्या भडगाव येथील शाखेनेही पाटील यांचे पूर्वीचे नियमित व्यवहार लक्षात घेता, कोणत्याही अटींशिवाय तत्काळ कर्ज मंजूर करून दिले. त्यानंतर महेंद्रने खादी ग्रामोद्योगमार्फतच गुऱ्हाळासाठी लागणारे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. त्यानंतर वडिलांसोबत व्यवसायावर लक्ष केंद्रित केले. बॅंकेच्या कर्जातून दिवसाकाठी 30 टन आणि संपूर्ण हंगामात 400 ते 450 टन उसाचे गाळप करणाऱ्या गुऱ्हाळाने वेग पकडला. अवघ्या तीन वर्षांतच दहा लाखांचे कर्ज फेडण्यात पिता-पुत्रांना यश आले. बॅंकेनेही लगेच ऊस वाहतुकीसाठी लागणाऱ्या ट्रॅक्टरसाठी वाढीव पाच लाखांचे कर्ज देऊ केले, यामुळे आत्मविश्वास वाढल्याने आता ते मिनी शुगर प्लॅन्ट टाकण्याच्या विचारात आहेत.
शेतकऱ्यांना जागेवरच पैसे
गुऱ्हाळाचा विस्तार वाढल्याने श्री. पाटील यांना सध्या रोज सरासरी 20 टन ऊस गाळपासाठी लागतो. स्वतःच्या 17 एकर क्षेत्रातील उसाशिवाय परिसरातील शेतकऱ्यांचा सुमारे 200 एकर ऊस ते खरेदी करतात. शेतकऱ्यांस रोखीने 1600 रुपये देऊन कारखाने देतील तो भाव नंतरच्या हप्त्यात देतात. विशेष बाब म्हणजे गुऱ्हाळाशेजारीच त्यांनी भुईकाटा बसवून घेतला आहे. तेथे शेतकऱ्यांच्या शेतावरून आणलेला ऊस सर्वप्रथम मोजला जातो, त्यानंतरच ट्रॅक्टर ट्रॉली खाली होते. यामुळे संबंधित शेतकऱ्यांच्या उसात कोणतीही घट लागत नाही. पाटील यांच्या गुऱ्हाळाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे, त्यांनी उत्पादित केलेला सर्व गूळ जागेवर विकला जातो. त्यास बाजारपेठेत डोक्यावर घेऊन विकत फिरावे लागत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांनाही रोखीने पैसे देणे शक्य होते.
इंधनासाठी पाचटाचा उपयोग
गुऱ्हाळाच्या भट्टीत जाळ निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जळाऊ लाकडांचे सरपण लागते. पर्यायाने वृक्षतोडीलाही चालना मिळते. हे टाळण्यासाठी श्री. पाटील त्यांच्या गुऱ्हाळासाठी रस काढल्यानंतर शिल्लक राहणारे उसाचे पाचट, मक्याच्या दाणे काढलेल्या कणसांचे बुट्टे वापरतात. सहज आणि विनामूल्य उपलब्ध होणाऱ्या सरपणामुळे त्यांच्या इंधनखर्चात चांगलीच बचत होते, त्याशिवाय गुऱ्हाळातून निघणारी राख व मळीचा वापर ते शेतीसाठी खत म्हणून करू शकतात.
: हिरामण पाटील - 9921264095.
No comments:
Post a Comment