Sunday, March 27, 2011

करिअरच्या विदेशी वाटा

Source: http://www.esakal.com/esakal/20110327/4877447190961459799.htm

 करिअर किंवा शिक्षणासाठी परदेश गाठणे, हा पर्याय आता अगदीच खूप सोपा झालाय. परदेशात यशस्वी करिअर करणे हे आता नुसते स्वप्न राहिलेले नसून ती एक शक्‍यता आहे. पुरेशी माहिती घेऊन या पर्यायाचा वापर केला, तर करिअरची उभारणी अधिक भक्कम पायावर होते. परदेशातील युवा पिढी करिअर, शिक्षणाकडे कशी पाहते...? काय आहेत परदेशातील पर्याय...? कोणत्या संधी तिथे वाट पाहत आहेत...? या आणि अशा अनेक प्रश्‍नांची उत्तरे...

'फॉरेन'चा करिअर ट्रॅक
  • विशेषतः पाश्‍चात्य देशांमध्ये साधारणतः वयाच्या चौदाव्या वर्षीच मुले अर्धवेळ काम करू लागतात.
  • शैक्षणिक सुविधा विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने असंख्य पर्याय समोर असतात.
  • कोणता पर्याय निवडावा, यासाठी सरकार, स्वयंसेवी संस्था मदतीला तयार असतात.
  • शिक्षणासाठी सरकारची आर्थिक मदत शैक्षणिक कर्जाच्या रूपाने उपलब्ध असते.
  • शिक्षण संपल्यावर नोकरीत समाधानकारक पगार मिळायला सुरवात झाल्यानंतरच कर्ज फेडायचे असते.
  • याच्या कुठल्याही टप्प्यावर व्यवसायात बदल करण्यासाठी शिक्षण-प्रशिक्षण घेणे सहजशक्‍य आहे.
  • वयाच्या 45 व्या वर्षी नोकरीचे क्षेत्र बदलण्यासाठी डिप्लोमा कोर्स करण्याची संधी उपलब्ध असते.
'करिअर'ची लाईफ स्टाईल
  • पाश्‍चात्य देशांत 'करिअर'चा अर्थ भारतापेक्षा वेगळा घेतला जातो.
  • नोकरी-व्यवसाय करणे हाच जीवन जगण्याचा मुख्य हेतू आहे, असे मानले जात नाही.
  • शिक्षण घेतानाच पोटासाठी अथवा नोकरीसाठी शिक्षण घेतले जात नाही.
  • "जीवन जगायला मदत म्हणून नोकरी करा; फक्त नोकरी करण्यासाठी जगू नका' हा मंत्र कटाक्षाने पाळतात.
  • कामाच्या वेळेनंतर त्याबद्दल विचारही मनात नसतो.
"तिथले' विद्यार्थी...
  • वैयक्तिक आवडीच्या विषयातच विद्यार्थी शिकतात.
  • विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक मतस्वातंत्र्याचा मुद्दाही महत्त्वाचा आहे.
  • पालकांचा फारसा प्रभाव असत नाही. ते केवळ सल्लागार असतात.
  • आठ तास काम आणि बाकी वेळ कुटुंबासाठी, स्वतःसाठी यात तडजोड न करता जे काम करता येईल तेच यांचे करिअर!
  • प्रवास, राहण्याची गैरसोय, कुटुंबाला-स्वतःला वेळ देता न येण्यासारखी कामे, बढत्या, बदल्या हे लोक स्वीकारत नाहीत.
संधींची खाण
ऑ स्ट्रेलियामध्ये येणारे भारतीय हे प्रामुख्याने अकुशल- कमी कौशल्य गटात मोडतात. खाणकाम हा मोठा उद्योग असल्याने पूर्वी म्हणजे अगदी 20-30 वर्षांपूर्वी लोक जेव्हा यायचे, आणले जायचे, तेव्हा स्थानिक प्रशासन त्यांना भत्ते आणि नोकरीच्या माध्यमातून मदत करत असे. आता परिस्थिती बदलते आहे. आशियाई आणि पश्‍चिम आशियातील तरुणांचे प्रमाण जास्त झाल्याने कमी कौशल्याची कामे करण्यासाठी परदेशातून लोक बोलावण्याची गरज उरली नाही. इथे लोकसंख्या वाढते आहे. तरुणांना कामे उपलब्ध करून देणे सरकारला जिकिरीचे होत आहे. असलेली कामे जर बाहेरचे लोक मिळवणार असतील, तर स्थानिकांनी करायचे काय, या प्रश्‍नातून स्थानिक आणि बाहेरचे हा वाद इथे सुरू झाला आहे.

'पर्मनंट रेसिडेन्स' दर्जा
गेल्या वर्षापर्यंत इथे येणारे अनेक विद्यार्थी हे असेच कमी कौशल्याचे शिक्षण असणारे वा त्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेले तरुण-तरुणी असत. उदाहरणार्थ ः प्लंबर, सुतारकाम, केशकर्तन, आचारी, साफ-सफाई इत्यादी. काही प्रमाणात बायोटेक, आयटी, अकाउंटन्सी, कॉमर्ससारखे उच्च तंत्रज्ञानाचे कोर्स करणारे विद्यार्थीही असत; परंतु उच्च-तंत्रज्ञानावर आधारित नोकऱ्या खूप कमी असल्याने या विद्यार्थ्यांना इथे पडेल ते काम करावे लागे. येणाऱ्या बहुसंख्य विद्यार्थ्यांचा उद्देश हा इथे पीआर (कायमचे रहिवासी) मिळवणे हाच असे. तो पूर्वी दोन वर्षांच्या कोर्ससाठी आले, की हा दर्जा मिळत असे. गेल्या वर्षी त्याची अट चार वर्षे करण्यात आली. त्यामुळे यंदा भारतीय अथवा परदेशी विद्यार्थिसंख्या 50 ते 70 टक्‍क्‍यांनी कमी झाली! आता जे विद्यार्थी आहेत, त्यात प्रामुख्याने उच्च तंत्रज्ञान आणि वैद्यकीय क्षेत्रातील आहेत. त्यातील अनेक जण परत जाण्याचा पर्याय खुला ठेवूनच आलेले आहेत. वैद्यकीय क्षेत्राला इथे कुशल मनुष्यबळाची खूपच आवश्‍यकता आहे. बहुतेक भारतीय डॉक्‍टर इथे येण्याचा आणि स्थिरावण्याचा प्रयत्न करीत आहेत. अन्य क्षेत्रांत, पर्यटन हा मोठा व्यवसाय असल्याने त्या अनुषंगाने रिटेल क्षेत्रामध्ये (मॉल, खाद्यपदार्थांच्या दुकानांच्या साखळ्या, पर्यटनस्थळांची देखभाल इत्यादी) मनुष्यबळ पाहिजे असल्याने अनेक विद्यार्थी शिक्षण घेताना रिटेलमध्ये काम करतात.

नोकऱ्या आणि व्यवसायही
वाढत्या लोकसंख्येला पूरक म्हणून सेवाक्षेत्रामध्ये प्रचंड संधी इथे असतात. इथली राहणीमानाची पद्धत, जीवन जगणे आणि काम करणे याचा मेळ घालताना सढळ हस्ते खर्च करण्याची मानसिकता यांचा विचार करता रिटेल, खाद्यपदार्थ, पर्यटनक्षेत्रात इथे संधी आहेत. वेळेवर काम पूर्ण करून देण्याची तयारी, दर्जाबद्दल तडजोड नसणे या मुख्य गोष्टी लक्षात ठेवून जर व्यवसाय, नोकरी केली तर ऑस्ट्रेलियामध्ये उत्तम संधी आहेत. इथे एकदा व्यावसायिक काम घेतले तर ते नेमून दिलेल्या वेळेतच संपवले पाहिजे, अन्यथा दंड आकारला जातो. प्राथमिक पातळीवर संधीचा विचार केला तर घरातील दोघेही नोकरीला असताना घराची देखभाल करणे (साफसफाई, बागेला पाणी इत्यादी), कुटुंबासाठी स्वयंपाक करून देणे, पाळणाघर चालवणे, मोटारदुरुस्ती, इलक्‍ट्रिशियन हे स्वतंत्ररीत्या करता येण्यासारखे काही व्यवसाय आहेत. भारतीय पद्धतीचे जेवण हे ऑस्ट्रेलियन लोकांसाठीचे खास आकर्षण! भारतीयांची वाढती लोकसंख्या आणि इतरांना असणारे आकर्षण पाहता, घरपोच जेवण पोचवणारी साखळी निर्माण करणे ही मोठी संधी आहे. विद्यापीठ आणि शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असणारी कार्यालये यासाठीची तयार बाजारपेठ आहे. "ऑस्ट्रेलियन ओन अँड ऑपरेटेड' अर्थात स्थानिक उद्योगांना प्राधान्य देण्याच्या सरकारी योजनेमध्ये याच देशात उत्पादन केंद्रे, प्रक्रिया केंद्रे स्थापन करणे, त्यातुन स्थानिक गरजा भागवून शक्‍य झाल्यास निर्यात करणे ही मोठी गुंतवणूक करण्याच्या पातळीवरील संधी आहे. जहाजबांधणी उद्योगात येथील काही प्रयोग यशस्वी झालेले आहेत.

लंडन 'कॉलिंग'!
ब्रि टनची अर्थव्यवस्था सर्व्हिस-ओरिएंटेड असल्याने फायनान्स, हेल्थकेअर, हॉस्पिटॅलिटी, रिटेल आणि आर्टस यांसारख्या क्षेत्रांमध्ये ब्रिटिश तरुणांना जास्त संधी मिळतात. विद्यार्थिदशेपासून कार्यानुभव घेण्याच्या इथल्या पद्धतीमुळे शिक्षण निवडण्यापासून ते पदवी पूर्ण करेपर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रांतील कामाचा अनुभव इथल्या तरुणांना उपयोगास येतो. यामुळेच ब्रिटिश तरुणवर्ग करिअरची निवड स्वतःच्या आवडीनुसार सहज करू शकतो. करिअर बदलायचे असल्यास योग्य निर्णय घेताना वेगवेगळे कार्यानुभवच उपयोगास येतात. भारतामध्ये विद्यार्थिदशेत कार्यानुभव घेणे फारसे प्रचलित नसल्याने आपल्या तरुणांचे करिअर बहुदा शिक्षणावर अवलंबून असते. तसे पाहिले तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेण्याचे प्रमाण इथे भारतापेक्षा कमी आहे, याचे कारण म्हणजे पदवीपेक्षा गुणवत्ता आणि कामाला असलेले महत्त्व.

कर्ज फेडून वर बचत
ब्रिटनमधील अनेक प्रस्थापित डॉक्‍टर्स, चार्टर्ड अकाउंटंट्‌स, आर्किटेक्‍ट्‌स आणि आयटी प्रोफेशनल्स मराठी आहेत. मात्र, गेल्या 3-4 वर्षांत हॉस्पिटॅलिटी, ऑईल-गॅस, बॅंकिंग आणि फायनान्स या क्षेत्रांत भारतातील खूप मराठी मुले इथे येऊन करिअर घडवत आहेत. परदेशात कुठेही काम करण्यासाठी योग्य व्हिसा मिळणे, हा मोठा घटक असतो. मात्र, ब्रिटनच्या एचएसएमपी व्हिसाअंतर्गत अनेक सुशिक्षित भारतीय स्वतःच्या गुणवत्तेवर व्हिसा मिळवून आले आणि यशस्वी झाले. त्याबरोबर अनेक मराठी विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी "स्टुडंट व्हिसा'वर आले आहेत आणि शिक्षणाबरोबर अर्थार्जन करत आहेत. शिक्षण पूर्ण झाल्यावर हे विद्यार्थी काही काळ ब्रिटनमध्ये नोकरी करू शकतात. त्यामुळे शिक्षणासाठी घेतलेले कर्ज फेडून वर बचतही होते. अनेक विद्यार्थ्यांचे एम्प्लॉयर्स कामाची गुणवत्ता पाहून "वर्क व्हिसा' करून देत असल्यामुळे गुणवान मुलांना इकडे चांगले संधी आहे.

ऑलिम्पिकमुळे संधी वाढल्या
ब्रिटनमध्ये खास करून दोन निमित्तांनी संधी निर्माण होणार आहेत. पहिले म्हणजे वर सांगितल्या प्रमाणे "आर्थिक' वाढीसंबंधी, ज्यामध्ये बॅंकिंग, फायनान्स, हॉस्पिटॅलिटी, कन्स्ट्रक्‍शन आणि अभियांत्रिकी सेवा येतात, पुढचे वर्ष ऑलिम्पिकचे असल्याने हॉस्पिटॅलिटी क्षेत्र तर आतापासूनच वेगात आहे. तसेच इथल्या ऑईल-गॅस कन्सल्टन्सींना मोठे प्रोजेक्‍ट्‌स मिळाल्यामुळे त्या तेजीत आहेत.

मराठी रेडिओ चॅनेललाही मागणी
ब्रिटनची कलाक्षेत्रातील गुंतवणूक आणि त्यामुळे पर्यटकांकडून मिळणारा आर्थिक फायदा पाहता, येत्या काळात गुणी भारतीय कलाकार, दिग्दर्शक, संगीतकार किवा तांत्रिक कामगारांना संधी मिळतील. खासकरून ब्रिटनमधला वेगाने वाढणारा भारतीय समाज आणि त्याची आर्थिक ताकद यामुळे सांस्कृतिक, धार्मिक, खाद्य आणि परिधानविषयक क्षेत्रात खूप संधी मिळतील. यामध्ये वेडिंग आणि इव्हेंट प्लॅनिंग, ड्रेस डिझायनिंग, स्थानिक टीव्ही, रेडिओ चॅनेल्स (ब्रिटनमधील मराठी लोकसंख्या पाहता मराठी रेडिओ चॅनेललाही मागणी आहे). धार्मिक सेवा आणि शेफसारख्या संधी आहेत. या क्षेत्रात नोकरीच्याच नव्हेत; तर व्यवसायाच्या संधी आजही उपलब्ध आहेत. सध्या भारतीय वाईन व्यावसायिकांसाठी ब्रिटनची बाजारपेठ उपलब्ध होत आहे. जागतिक मंदीमुळे परिस्थिती थोडी बदलली आहे. बेरोजगारीचे प्रमाण वाढल्यामुळे व्हिसाचे नियम बदलून थोडी बंधने आली आहेत. मात्र, ही एक तात्पुरती स्थिती असून, येत्या काही वर्षांत सुशिक्षित तरुणांना भरपूर संधी मिळणार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रिटनची लोकसंख्या हवी त्या प्रमाणात वाढत नसल्याने परदेशी प्रोफेशनल्सची इथल्या आर्थिक वाढीसाठी निश्‍चित गरज आहे. त्यामुळे येत्या 3-4 वर्षांत अनेक होतकरू मराठी तरुण ब्रिटनला कर्मभूमी बनवतील, असा आडाखा बांधायला हरकत नाही.

शिक्षण 'अरब वर्ल्ड'मधील
सं युक्त अरब अमिरातीचा (यूएई) विचार करता गेल्या 7-8 वर्षांत शिक्षणक्षेत्राशी निगडित वातावरण खूपच बदलले आहे. इंडियन कॉन्स्युलेटने जाहीर केलेल्या माहितीनुसार सध्या दुबईत भारतामधील 19 शिक्षण संस्थांच्या शाखा कार्यरत असून जवळपास पाच हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रामुख्याने ते 'यूएई' आणि इतर 'जीसीसी' देशांमधून आलेले आहेत.
यात काही भारतामधील अत्यंत प्रथितयश संस्था आहेत. काही वर्षांपूर्वी यूएई आणि इतर जीसीसी देशांमधील बहुतेक मुले उच्च शिक्षणासाठी एकतर भारतात जायची किवा पाश्‍चिमात्य देशांमध्ये जाण्याकडे त्यांचा कल असायचा; परंतु आता भारतातील शिक्षण संस्थांच्या शाखा आल्यानंतर हे चित्र खूपच बदलले आहे. या शाखांचे यश कशात दडले आहे? सुलभ प्रवेशप्रक्रिया आणि प्रवेशपरीक्षेचा अभाव ही दोन प्रमुख कारणे आहेत. त्याचबरोबर प्रचंड स्पर्धा, अगदी अर्ध्या आणि एक टक्‍क्‍यांसाठी होणारी मारामारी आणि त्यामुळे निर्माण होणारा ताण आणि त्यातच प्रथितयश संस्थेत मिळू न शकणारा प्रवेश यामुळे भारतामधून देखील विद्यार्थी आता शिक्षणासाठी दुबईला येत आहेत.

शिक्षणासाठी वाढता ओढा
आता हा प्रश्‍न नक्कीच मनात येतो की, जर इतक्‍या सहजपणे इथे प्रवेश मिळत असेल, तर शिक्षणाचा दर्जा कसा असेल? परंतु या संस्थांच्या प्रतिनिधींकडून मिळालेल्या माहितीनुसार, जरी इथे "कॅट' परीक्षेचा अभाव असला तरी निवडप्रक्रिया अत्यंत निकोपपणे केली जाते. बिट्‌स पिलानी, स. पी. जैन मॅनेजमेंट, माहे मणिपाल या काही प्रमुख संस्था, ज्या भारतात अग्रगण्य आहेत, त्या इथे कार्यरत आहेत. 'बिट्‌स'ची रास अल खैम येथील संस्था, जी 'बिट्‌स' मेसारा, रांचीची शाखा आहे, इथे जो अभ्यासक्रम शिकवला जातो त्याच्या प्रश्‍नपत्रिका या रांचीच्या पालक संस्थेकडून येतात आणि उत्तरपत्रिकादेखील त्याच दिवशी संध्याकाळी रांची येथे तपासण्यासाठी पाठवण्यात येतात. याचबरोबर निकाल आणि पदवीदेखील रांची येथूनच वितरित करण्यात येते.

सध्या येथे अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन शाखेसाठी 50 टक्के गुणाची पात्रता असून या घडीला साधारण 600 ते 700 विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून त्यापैकी 95 टक्के हे भारतीय विद्यार्थी आहेत आणि त्यापैकी 10 टक्के विद्यार्थी भारतामधून आलेले आहेत. 'बिट्‌स'च्या दुबई शाखेत गुणपात्रता 60 टक्के असून प्रथम प्राधान्य यूएई आणि इतर जीसीसी देशांमधील मुलांसाठी आहे. त्यानंतर काही जागा भारतामधून येणाऱ्या मुलांसाठी राखीव आहेत. सध्या 1500 ते 1700 विद्यार्थी येथे शिक्षण घेत असून त्यापैकी 40 टक्के विद्यार्थी भारतामधून आलेले आहेत. स. पी. जैन या संस्थेच्या दुबईमधील शाखेत एकूण 400 विद्यार्थी शिक्षण घेत असून त्यापैकी 85 टक्के हे भारतीय आहेत. माहे मणिपाल या संस्थेत 1700 ते 1800 विद्यार्थी शिक्षण घेत असून 95 टक्के विद्यार्थी भारतीय आहेत आणि त्यापैकी पाच टक्के भारतामधून आलेले आहेत.

आंतरराष्ट्रीय अनुभव
संयुक्त अरब अमिरातीमधील सुरक्षित आणि बऱ्याच अंशी आपल्या संस्कृतीशी मिळते-जुळते वातावरण यामुळे पालक आपल्या मुलांना शिक्षणासाठी इकडे मोठ्या प्रमाणावर पाठवत आहेत. मात्र हे शिक्षण भारतामधील शिक्षणापेक्षा तीन ते चार पटींनी महाग आहे; परंतु इथे शिक्षण घेण्याचा मुख्य फायदा म्हणजे अत्यंत सहजपणे या मुलांना उपलब्ध होणारा आंतरराष्ट्रीय अनुभव.

खर्चाबाबत संस्थांच्या प्रतिनिधींचे म्हणणे असे : "हा खर्च यूएईच्या जीवनमानानुसारच असून, त्याची तुलना इतर देशांबरोबर करणे चुकीचे आहे.'

जॉबची गॅरंटी !
न्यूझीलंडमधील तरुण पिढीचे करिअरबाबत ढोबळ मानाने दोन गट पडतात. यातला मनोरंजक भाग म्हणजे ते त्यांच्या वंशाशी संबंधित आहेत. भारतीय वंशाच्या आणि एशियन युवा पिढीच्या करिअरची सुरवात शिक्षणाला केंद्रस्थानी ठेवून होते. याउलट पॅसिफिक देशांतून आलेल्या मंडळींचे करिअर कष्टार्जित असते. इथला कोणताही मुलगा किंवा मुलगी आर्थिक किंवा सामाजिक विषमतेमुळे शिक्षणापासून वंचित ठेवला जात नाही. आपल्याकडे जशी अकरावी-बारावी आहे आणि त्यानंतर कॉलेज शिक्षण असतं, तसं इथे दहावीपासून तेरावीपर्यंत कॉलेज किंवा ग्रामर स्कूल असतं आणि नंतर ग्रॅज्युएशनसाठी मुलं युनिव्हर्सिटीमध्ये किंवा टेक्‍निकल संस्थेत जातात.

स्टडी-लिंक प्रोग्रॅम
ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, ते पालक शिक्षणाच्या खर्चाचा भार सोसू शकतात; पण ज्यांना हे शक्‍य नाही त्यांच्यासाठी स्टडी-लिंक नावाचा प्रोग्रॅम आहे. फक्त एका फोन कॉलवर इलक्‍ट्रिशियन, प्लंबरपासून (यांची कमाई खूप असते) डॉक्‍टर, इंजिनिअर अगदी पायलट बनायचं असेल, तरी तुम्हाला शिक्षणासाठी व्याजरहित कर्ज मिळतं. अर्थात तुम्हाला ग्रामर स्कूलमध्ये तेवढे क्रेडिट्‌स मिळवावे लागतात. हे क्रेडिट म्हणजे त्या विद्यार्थ्यांनी वर्षभर सबमिशन्स, टेस्ट, वार्षिक परीक्षा या सर्वांच्यावर आधारित मिळालेले मार्क्‍स असतात. शेवटच्या परीक्षेला पोपटपंची, अहोरात्र अभ्यास, स्पेशल क्‍लास, ट्यूशन, आई-वडिलांसा "टेन्शन', पोरांच्या अभ्यासासाठी रजा; मग मार्कांची "रॅट रेस'; त्यानंतर बाळू किंवा बबडीला पंच्याण्णवऐवजी 94.8 मार्क पडून ऍडमिशन चुकल्यामुळे पडलेले चेहरे असले प्रकार नसतात. त्यामुळे मुलं-मुली बिनधास्त मौजमस्ती करतात; पण त्याचबरोबर वर्षभर इमानेइतबारे कष्ट करून पुरेसे मार्क गाठीशी पाडतात. ही मंडळी साधारण पंधरा वर्षांची झाली की, एखादी छोटीशी नोकरी करायला लागतात. सतरा-अठरा वर्षांची ही मुलं शाळेतून बाहेर पडायच्या वेळेस स्वतःची बऱ्यापैकी पुंजी जमा करून असतात. त्यांचं पुढचं प्लॅनिंग पक्कं झालेलं असतं आणि त्यासाठी आई-वडिलांकडे त्यांना हात पसरायला लागत नाहीत. एखाद्या विद्यार्थ्याला जर क्रेडिट कमी मिळाले आणि समजा ग्रॅज्युएशनसाठी त्याला ऍडमिशन मिळाली नाही तर तो त्या संदर्भातले छोटे कोर्सेस अथवा डिप्लोमा करून वर जातो. जर एखाद्याला शिक्षणात फारसं यश मिळालं नाही तर तो किंवा ती एखादी साधी नोकरी करून हळूहळू शिड्या वर चढत एखाद्या मोठ्या कंपनीचा मॅनेजर बनू शकतो. युवा पिढीने व्यवसायात उतरण्यास प्रोत्साहन देण्यास सरकार मदत करते. इथे तरुण पिढीची खास दखल घेण्यासाठी, त्यांच्या मदतीसाठी "मिनिस्ट्री ऑफ यूथ डेव्हलपमेंट' हे मंत्रिमंडळात खाते आहे. त्यांच्यासाठी 'यंग एंटरप्राइजेस' सारखे ट्रस्ट आहेत.

श्रमाला प्रतिष्ठा
आजकाल भारतातून; विशेषतः छोट्या शहरांतूनही तरुण पिढी इथे येऊन स्थिरावू पाहते आहे. काही ठराविक क्षेत्रात म्हणजे हॉटेल आणि केटरिंग, मॅनेजमेंट, आय टी आदी क्षेत्रात मनुष्यबळाची मागणी आहे. या मागणी असलेल्या क्षेत्रात शिक्षण पूर्ण केले की न्यूझीलंडमध्ये स्थिरावता येते. भारतातल्या बॅंका यासाठी कर्ज देतात. ते घेऊन हे युवक-युवती शिक्षण पूर्ण करतात. एकीकडे काम करतात. तिकडे घेतलेले कर्ज ते मेहनत करून दोन-तीन वर्षांत फेडून मोकळे होतात. न्यूझीलंडबद्दल एक-दोन गोष्टी मला प्रकर्षाने जाणवतात. त्या म्हणजे श्रमाला इथे खूप प्रतिष्ठा आहे. काही कारणांनी तुम्हाला आर्थिक ताण आला तर तुम्ही छोटा-मोठा जॉब करून तग धरू शकता. तुम्हाला कोणीही हसत नाही. अगदी शून्यातून तुम्ही जग निर्माण करू शकता. फक्त हिंमत आणि स्वतःवर विश्‍वास हवा!

Tuesday, March 22, 2011

Career Planning (Article)

Source : http://bit.ly/CarrerPlan

करीअर प्लानिंग (व्यावसायिक यशाची पायाभरणी )


(हा लेख दैनिक देशदूत, अहमदनगर च्या दि २२ मार्च २०११ च्या अंकार प्रकाशित केला गेला आहे. http://www.deshdoot.com/images/eclassifieds/pan4_81257.jpg_
दहावी-बारावी च्या परिक्षा झाल्या कि सर्व पालकांना प्रश्न पडतो, पुढे काय? पण करीअर चा विचार हा फक्त दहावी-बारावी नंतरचाच न करता, प्राथमिक स्तरावरुनच याची पायाभरणी व्हावी या उद्देशाने करीअर प्लान करण्यासाठी 'श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्र, करडकवाडी ' ने केलेल्या अभ्यासात पुढील महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे या महत्वाच्या बाबी लक्षात घेउन पालकांनी आपल्या पाल्यांच्या भवितव्याचा विचार प्राथमिक स्तरावरुनच करावा. उदा. बिहार, उत्तर प्रदेशातील पालक त्यांच्या पाल्यांना  ९ वी त असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांसाठी तयारी सुरु करतात, त्यामुळे ती मुले बहुसंख्येने केंद्रीय सेवेत असतात. व्यावसायिक समाज उदा. गुजराती/ मारवाडी, आपल्या मुलांना लहानपणापासुनच व्यावहारिकतेचे शिक्षण देतात कि जेणेकरुन ही मुले त्यांचे व्यवसाय पुढे भरभराटीला आणतात.
करीअर प्लान करणे म्हणजे काय?
 ही एक जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. त्यात प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश होतो:  नोकरी/व्यवसायाचे क्षेत्र निवडणे, नोकरी मिळवणे, नोकरी/व्यवसायात प्रगती करणे, प्रगतीच्या एका टप्प्यावर नोकरी/व्यवसायाचे क्षेत्र बदलणे, आणि कार्यकाळ पुर्ण झाल्या नंतर आरामदायक निवृत्त होणे आणि निवृत्तीचा काळ सुखात घालवणे. हो, स्वतःच्या व्यवसायातुन देखील निवृत्त होता येते! त्यासाठी पुढील पिढीकडे/नेतृत्वाकडे विश्वासाने सुत्रे सोपवणे गरजेचे असते. त्याहुन महत्वाचे म्हणजे आपल्या कार्यकाळात असे सक्षम नेतृत्व निर्माण करणे महत्वाचे असते! उदा. टाटा उद्योग समुह.
वरील सर्व घटना आयुष्यात एकदा किंवा अनेकदा घडु शकतात, कारण प्रत्येक वळणावर आपण आपली ध्येये नव्याने निश्चित करत असतो.

करीयर प्लानिंग ही चार टप्प्यांची मालिका आहे.
१) 'स्व' ची ओळख
२) आपल्या पुढील पर्यायांची ओळख
३) योग्य पर्यायाची निवड
४) त्यानुसार योग्य कार्यवाही
 
१) 'स्व' ची ओळखः ही प्रामुख्याने चार कसोट्यांवर केली जाते:
अ) आपल्या जीवनात आपण कोणत्या गोष्टींना / मुल्यांना महत्व देतो?  उदा. नोकरी व्यवसाय करत असताना पुढील पैकी आपण काय महत्वाचे मानतो:  प्रतिष्ठा, सुरक्षितता, परस्पर संबंध, इतरांना सहकार्य/मदत, कामाचे बदलता येण्याजोगे 'शेड्युल', फिरतीचे काम, मोकळा वेळ, जास्त पगार.

ब) आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये कामाची आवड आहे?
आपण निवडत असलेल्या क्षेत्रातील आपल्या आवडत्या/नावडत्या कामाचा जमाखर्च मांडणे.  एक महत्वाची बाब म्हणजे," समान आवड असणारे लोक, एकाच प्रकारचे काम करताना जास्त आनंद मिळवतात." आपल्या आवडी-निवडी ची उदाहरणे : वाचन, व्यायाम, खेळ, विणकाम, इ दैनंदीन गोष्टी.

क) आपले व्यक्तीमत्व कसे आहे?
आपले प्रेरणास्थान्/प्रेरणादायक गोष्टी कोणत्या आहेत? आपल्या गरजा काय आहेत? आपला स्वभाव कसा आहे?
ड) आपल्याकडे कोणती कौशल्ये आहेत?
आपल्याला कश्याची आवड आहे त्याचबरोबर आपल्याकडे कोणती कौशल्ये आहेत कि जी आपल्याला काम करताना आनंद मिळवुन देतात. या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. अन म्हणुन आपल्या आवडीचे काम करताना त्यासाठीची कौशल्ये आत्मसात करण्यावर भर दिला गेला पाहिजे.
याव्यतिरिक्त, स्व-ची ओळख करुण घेताना आपल्याला कुठल्या पातळीवर काम करायचे आहे? कुठल्या वातावरणात काम करायचे आहे? कुठल्या क्षेत्रात वैयक्तीक विकास साधायचा आहे? आणि आपण सध्या कुठे आहोत? याचा ताळेबंद मांडला पाहिजे.
२) आपल्या पुढील पर्यायांची ओळख:
आपल्या आवडीच्या क्षेत्रातील पर्यायांची चाचपणी करणे. त्यासाठी खालील निकष लावता येतात.
अ) असे क्षेत्र जिथे पदवी ची आवश्यकता नाही.
ब) असे क्षेत्र जिथे पदविका (डिप्लोमा) चालतो.
क) पदवी नसताना ही जास्त मिळकत देणारे क्षेत्र.
पर्यायांची निवड करण्यासाठी खालील अनेक व्यक्ती, संस्थाशी विचारविनिमय करणे आणि ज्या क्षेत्रात जास्त संधी आहेत, त्या तपासणे हा एक उपाय आहे. ज्या क्षेत्रात कामाची आवड आहे, त्यातील कंपन्यांची माहिती मिळवणे, 'जॉब मार्केट' चा अभ्यास करणे. त्यातुन मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन अर्धवेळ नोकरी, स्वयंसेवक, ट्रेनी म्हणुन काम शोधणे हे उपाय वापरावेत.
 ३) योग्य पर्यायाची निवडः
 
मिळालेल्या माहितीच्या आधारे  आपली आवड आणि उपलब्ध क्षेत्रे यातुन पर्यायांची तपासणी करणे.  छोटी आणि मोठी ध्येये, कमी अथवा दीर्घ मुदतीची ध्येये यांची सांगड घालुन योग्य पर्याय निवडणे.

४) योग्य कार्यवाही:
वरील अभ्यासातुन आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी काय पाउले उचलावी लागतील त्याची आपल्याला कल्पना येईल. व्यवसाय करायचा असेल तर, व्यवसायासाठी अधिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी ची आवश्यकता लक्षात येईल. ती कुठल्या प्रकारे आत्मसात करायची याची माहिती मिळवलेली आहे. व्यवसायासाठी लागणार्‍या आर्थिक बाबींची माहिती झालेली असेल. जर नोकरी करायची असेल तर नोकरी मिळवण्यासाठी चा 'मास्टर प्लान' तयार झालेला असेल. आपला उमेदवारीसाठी अर्ज आणि 'बायो-डाटा' बनवला गेला असेल. कंपनी - जॉब मार्केट चा अंदाज असेल आणि आपण नोकरी च्या मुलाखतीसाठी तयार असाल! अन फक्त एक पाउल उचलायचा अवकाश असेल......

... लक्षात ठेवा, 'हजार' मैलांचा प्रवास हा पहिल्या 'एका'  पावलानेच सुरु होतो!

आपल्या व्यावसायिक यशासाठी हार्दिक शुभेच्छा!


डॉ. भारत गंगाधर करडक
श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्र,
मु.पो:-करडकवाडी, ता-नेवासा
जि-अहमदनगर,
पिन ४१४ ६०३
वेबसाईटः http://www.kardakwadi.org/
ई-मेलः kardakwadi@gmail.com