http://loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=114508:2010-11-12-21-04-50&catid=50:2009-07-15-04-02-43&Itemid=61
उमेश मोरगावकर, पाथर्डी, १२ नोव्हेंबर
दिवसेंदिवस बिकट होत चाललेल्या कचऱ्याच्या समस्येवर मात करण्यासाठी स्वत: निवडून आलेल्या प्रभागात कचऱ्यापासून गांडूळ खत निर्मितीचा अभिनव उपक्रम नगरसेवक डॉ. दीपक देशमुख यांनी राबविला आहे. यामुळे अन्य नगरसेवकांसमोर त्यांनी आदर्श उभा केला आहे. या प्रकल्पाचे अनुकरण अन्य पालिकांनी केल्यास स्वच्छ व सुंदर शहराची कल्पना प्रत्यक्षात साकारेल.
राजकारणापेक्षाही समाजकारणात रस असणारे नगरसेवक अशी डॉ. देशमुख यांची ख्याती आहे. जागतिक एडस्दिनी जागृती रॅली काढणे, पर्यावरण दिन साजरा करणे, शहर व त्यालगतच्या परिसरात नियमित वृक्षारोपण करणे असे उपक्रम वर्षभर राबविणारे देशमुख बर्ड या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालविणाऱ्या संस्थेचे व वंदे मातरम् प्रतिष्ठानचे संचालक आहेत. स्वच्छ प्रतिमेची व्यक्ती म्हणून भाजपने त्यांना फुलेनगर विभागातून उमेदवारी दिली व ते निवडूनही आले. आपला प्रभाग स्वच्छ असावा ही त्यांची प्रामाणिक इच्छा. मात्र, पालिकेच्या आरोग्य विभागात असलेला अपुरा कर्मचारी वर्ग अन् शहराचा वाढता विस्तार या कात्रीत सुंदरनगर, फुलेनगरला ही संकल्पना सुरूवातीला राबविणे देशमुखांच्या आवाक्याबाहेर गेले. हिवरेबाजारचे उपसरपंच पोपट पवार यांचे मित्र असलेल्या देशमुख यांनी कचऱ्यापासून गांडूळ खत कसे निर्माण करता येईल याचे प्रशिक्षण घेतले. यानंतर त्यांनी प्रभागातील प्रत्येक घरात जाऊन कचऱ्याच्या समस्येने कसे उग्ररूप धारण केले आहे हे पटवून देऊन आपण सुरू करत असलेल्या गांडूळ खत निर्मिती प्रकल्पाची माहिती दिली. ओला व सुका कचरा वेगवेगळा साठवावा असा सल्ला देत पदरमोड करीत त्यांनी प्रत्येक घरात दोन कचऱ्याचे डबे दिले. त्यात ओल्या कचऱ्याच्या डब्यात भाजीपाल्याचा कचरा, फळांची साल, उरलेले शिळे अन्न, अंडय़ाचे कवच, तर सुक्या कचऱ्याच्या डब्यात प्लॅस्टिक, कागद, थर्मोकोल, खिळे, काचा, तारा, धातू टाका असे सांगितले. त्याबाबतची माहिती पुस्तिकाही घरोघर दिली. पालिकेच्या माध्यमातून दोन हातगाडय़ा बनविल्या. प्रत्येक गाडीत आठ डबे बसविले गेले. गाडी हाताळणाऱ्या पालिका कर्मचाऱ्यांना देशमुख यांनी अद्ययावत पोषाखही शिवले. हे कर्मचारी प्रभागातील प्रत्येक घरासमोर जाऊन शिट्टी वाजवितात. त्यानंतर घरातील महिला दोन्ही डब्यातील कचरा टाकतात. हा कचरा प्रभागातील पाण्याच्या टाकीजवळील खत प्रकल्पात आणला जातो. तेथे दोन्ही हौदात तो टाकून त्यात गांडुळे सोडली जातात. पूर्ण खत तयार झाल्यावर ते पॅक करून देशमुख ते ज्यांना गरज आहे त्यांना मोफत देतात. पुढील महिन्यात या उपक्रमाला एक वर्ष पूर्ण होईल. देशमुख यांनी आपल्या प्रभागात पालिका निधीतून सिमेंट कॉँक्रिटचा रस्ता बनविला असून या रस्त्याच्या दुतर्फा झाडेही लावली आहेत. फुलेनगरमधून फेरफटका मारला असता सुंदर नगर फुलेनगर ही संकल्पना प्रत्यक्षात साकारलेली
दिसते.
सरकारची ग्रामस्वच्छता समिती पाहणी करण्यासाठी आल्यानंतर पालिका प्रशासन आवर्जून त्यांना या प्रभागात घेऊन जाते. हा प्रकल्प राबविण्यासाठी देशमुख यांनी वेळही दिला व खर्चही केला. त्याचे दृष्य परिणाम आज जाणवत आहेत.
No comments:
Post a Comment