Tuesday, March 22, 2011

Career Planning (Article)

Source : http://bit.ly/CarrerPlan

करीअर प्लानिंग (व्यावसायिक यशाची पायाभरणी )


(हा लेख दैनिक देशदूत, अहमदनगर च्या दि २२ मार्च २०११ च्या अंकार प्रकाशित केला गेला आहे. http://www.deshdoot.com/images/eclassifieds/pan4_81257.jpg_
दहावी-बारावी च्या परिक्षा झाल्या कि सर्व पालकांना प्रश्न पडतो, पुढे काय? पण करीअर चा विचार हा फक्त दहावी-बारावी नंतरचाच न करता, प्राथमिक स्तरावरुनच याची पायाभरणी व्हावी या उद्देशाने करीअर प्लान करण्यासाठी 'श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्र, करडकवाडी ' ने केलेल्या अभ्यासात पुढील महत्वाचे मुद्दे लक्षात घेतले आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेणे आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन मिळणे या महत्वाच्या बाबी लक्षात घेउन पालकांनी आपल्या पाल्यांच्या भवितव्याचा विचार प्राथमिक स्तरावरुनच करावा. उदा. बिहार, उत्तर प्रदेशातील पालक त्यांच्या पाल्यांना  ९ वी त असताना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षांसाठी तयारी सुरु करतात, त्यामुळे ती मुले बहुसंख्येने केंद्रीय सेवेत असतात. व्यावसायिक समाज उदा. गुजराती/ मारवाडी, आपल्या मुलांना लहानपणापासुनच व्यावहारिकतेचे शिक्षण देतात कि जेणेकरुन ही मुले त्यांचे व्यवसाय पुढे भरभराटीला आणतात.
करीअर प्लान करणे म्हणजे काय?
 ही एक जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. त्यात प्रामुख्याने पुढील बाबींचा समावेश होतो:  नोकरी/व्यवसायाचे क्षेत्र निवडणे, नोकरी मिळवणे, नोकरी/व्यवसायात प्रगती करणे, प्रगतीच्या एका टप्प्यावर नोकरी/व्यवसायाचे क्षेत्र बदलणे, आणि कार्यकाळ पुर्ण झाल्या नंतर आरामदायक निवृत्त होणे आणि निवृत्तीचा काळ सुखात घालवणे. हो, स्वतःच्या व्यवसायातुन देखील निवृत्त होता येते! त्यासाठी पुढील पिढीकडे/नेतृत्वाकडे विश्वासाने सुत्रे सोपवणे गरजेचे असते. त्याहुन महत्वाचे म्हणजे आपल्या कार्यकाळात असे सक्षम नेतृत्व निर्माण करणे महत्वाचे असते! उदा. टाटा उद्योग समुह.
वरील सर्व घटना आयुष्यात एकदा किंवा अनेकदा घडु शकतात, कारण प्रत्येक वळणावर आपण आपली ध्येये नव्याने निश्चित करत असतो.

करीयर प्लानिंग ही चार टप्प्यांची मालिका आहे.
१) 'स्व' ची ओळख
२) आपल्या पुढील पर्यायांची ओळख
३) योग्य पर्यायाची निवड
४) त्यानुसार योग्य कार्यवाही
 
१) 'स्व' ची ओळखः ही प्रामुख्याने चार कसोट्यांवर केली जाते:
अ) आपल्या जीवनात आपण कोणत्या गोष्टींना / मुल्यांना महत्व देतो?  उदा. नोकरी व्यवसाय करत असताना पुढील पैकी आपण काय महत्वाचे मानतो:  प्रतिष्ठा, सुरक्षितता, परस्पर संबंध, इतरांना सहकार्य/मदत, कामाचे बदलता येण्याजोगे 'शेड्युल', फिरतीचे काम, मोकळा वेळ, जास्त पगार.

ब) आपल्याला कोणत्या क्षेत्रामध्ये कामाची आवड आहे?
आपण निवडत असलेल्या क्षेत्रातील आपल्या आवडत्या/नावडत्या कामाचा जमाखर्च मांडणे.  एक महत्वाची बाब म्हणजे," समान आवड असणारे लोक, एकाच प्रकारचे काम करताना जास्त आनंद मिळवतात." आपल्या आवडी-निवडी ची उदाहरणे : वाचन, व्यायाम, खेळ, विणकाम, इ दैनंदीन गोष्टी.

क) आपले व्यक्तीमत्व कसे आहे?
आपले प्रेरणास्थान्/प्रेरणादायक गोष्टी कोणत्या आहेत? आपल्या गरजा काय आहेत? आपला स्वभाव कसा आहे?
ड) आपल्याकडे कोणती कौशल्ये आहेत?
आपल्याला कश्याची आवड आहे त्याचबरोबर आपल्याकडे कोणती कौशल्ये आहेत कि जी आपल्याला काम करताना आनंद मिळवुन देतात. या दोन्ही गोष्टींचा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. अन म्हणुन आपल्या आवडीचे काम करताना त्यासाठीची कौशल्ये आत्मसात करण्यावर भर दिला गेला पाहिजे.
याव्यतिरिक्त, स्व-ची ओळख करुण घेताना आपल्याला कुठल्या पातळीवर काम करायचे आहे? कुठल्या वातावरणात काम करायचे आहे? कुठल्या क्षेत्रात वैयक्तीक विकास साधायचा आहे? आणि आपण सध्या कुठे आहोत? याचा ताळेबंद मांडला पाहिजे.
२) आपल्या पुढील पर्यायांची ओळख:
आपल्या आवडीच्या क्षेत्रातील पर्यायांची चाचपणी करणे. त्यासाठी खालील निकष लावता येतात.
अ) असे क्षेत्र जिथे पदवी ची आवश्यकता नाही.
ब) असे क्षेत्र जिथे पदविका (डिप्लोमा) चालतो.
क) पदवी नसताना ही जास्त मिळकत देणारे क्षेत्र.
पर्यायांची निवड करण्यासाठी खालील अनेक व्यक्ती, संस्थाशी विचारविनिमय करणे आणि ज्या क्षेत्रात जास्त संधी आहेत, त्या तपासणे हा एक उपाय आहे. ज्या क्षेत्रात कामाची आवड आहे, त्यातील कंपन्यांची माहिती मिळवणे, 'जॉब मार्केट' चा अभ्यास करणे. त्यातुन मिळालेल्या माहितीचा आधार घेऊन अर्धवेळ नोकरी, स्वयंसेवक, ट्रेनी म्हणुन काम शोधणे हे उपाय वापरावेत.
 ३) योग्य पर्यायाची निवडः
 
मिळालेल्या माहितीच्या आधारे  आपली आवड आणि उपलब्ध क्षेत्रे यातुन पर्यायांची तपासणी करणे.  छोटी आणि मोठी ध्येये, कमी अथवा दीर्घ मुदतीची ध्येये यांची सांगड घालुन योग्य पर्याय निवडणे.

४) योग्य कार्यवाही:
वरील अभ्यासातुन आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी काय पाउले उचलावी लागतील त्याची आपल्याला कल्पना येईल. व्यवसाय करायचा असेल तर, व्यवसायासाठी अधिक कौशल्ये आत्मसात करण्यासाठी ची आवश्यकता लक्षात येईल. ती कुठल्या प्रकारे आत्मसात करायची याची माहिती मिळवलेली आहे. व्यवसायासाठी लागणार्‍या आर्थिक बाबींची माहिती झालेली असेल. जर नोकरी करायची असेल तर नोकरी मिळवण्यासाठी चा 'मास्टर प्लान' तयार झालेला असेल. आपला उमेदवारीसाठी अर्ज आणि 'बायो-डाटा' बनवला गेला असेल. कंपनी - जॉब मार्केट चा अंदाज असेल आणि आपण नोकरी च्या मुलाखतीसाठी तयार असाल! अन फक्त एक पाउल उचलायचा अवकाश असेल......

... लक्षात ठेवा, 'हजार' मैलांचा प्रवास हा पहिल्या 'एका'  पावलानेच सुरु होतो!

आपल्या व्यावसायिक यशासाठी हार्दिक शुभेच्छा!


डॉ. भारत गंगाधर करडक
श्री बाळकृष्ण ज्ञान केंद्र,
मु.पो:-करडकवाडी, ता-नेवासा
जि-अहमदनगर,
पिन ४१४ ६०३
वेबसाईटः http://www.kardakwadi.org/
ई-मेलः kardakwadi@gmail.com

No comments:

Post a Comment