www.kardakwadi.org
(हा लेख मेलबर्न, ऑस्ट्रेलिया येथे एप्रिल २०१० मध्ये झालेल्या 'अखिल ऑस्ट्रेलिया मराठी संमेलना' निमित्त प्रकाशित केलेल्या "हितगुज' विशेषांका मध्ये प्रसिद्ध झाला होता. विशेषांकाचे प्रकाशन जेष्ठ अभिनेते श्री. विक्रम गोखले ह्यांचे हस्ते झाले होते - श्री. भारत करडक)
प्रसंग १:
स्पेन मधील एक समुद्र किनारा. नेहमीप्रमाणे शुक्रवारी संध्याकाळी समुद्रकिनार्यावर फिरत असताना एक आशियायी चेहर्आने ओळखीचे स्मित दिले. मी ही हसलो. पुर्ब गावात मी एकटाच भारतीय असल्याने कुणी भारतीय वा आशियायी दिसला कि मी लगेच दोन शब्द बोलायला बघतो. यावेळी, समोरचा चेहरा ही बोलायला जास्त उत्सुक आहे असे वाटले. साधारण पन्नाशीचे वय, काळा रंग, मजबुत शरीर, चेहर्यावर एका जखमेचा ठळक व्रण! तो श्रीलंकेचा होता, भारताबद्दल विषेश आस्था होती. बाळासाहेब ठाकरे अन इंदिरा गांधींबद्दल अत्यंत आदराने बोलला. त्यांच्या आयुष्यात ह्या दोघांना देवापेक्षाही वरची जागा आहे असे म्हणाला.
वीस वर्षा पुर्वी तो श्रीलंकेतील एका खेडे गावात राहत असे. त्याचे आई-वडिल, भाऊ, बहिणी अन इतर कुटुंबीय. सुखाने जीवण जगत होता. लग्न ही ठरले होते..स्वपाळु दिवस होते! पण भविष्यात काही ऑरच लिहिलेले होते..... अचानक काही मित्रांच्या सांगण्यावरुन तो तामिळ अस्मितेसाठी सुरु झालेल्या हिंसक लढ्यात ओढला गेला. हाती शस्त्र आहे, अन तरुण रक्ताला साजेश्या पद्धतीने त्याने सरकारी यंत्रणे विरुद्ध बंड पुकारले. पण लढाई म्ह्टले कि हार जीत आलीच. एक दिवस गावावर सरकारी सैन्याने हल्ला केला. अन ह्याच्या स्वनांचा चक्काचुर झाला.. तो अन त्याचे काही साथीदार पळुन जाण्यात यशस्व्व झाले पण बाकी पुर्ण गाव नष्ट झाले. सगळे कुटुंबिय अन त्याची भावी जीवनसाथी मारले गेले.
संपुर्ण कुटुंब नाहिसे झाल्यावर हिंसक मार्गाचा तितकारा वाटु लागला. आपण मारलेल्या लोकांनाही आई वडिल भाऊ बहिण असतील .... हा विचार प्रथमच मनात आला. शस्त्र खाली टाकले. पण तथाकथित क्रांतीच्या या मार्गावर परतीचे मार्ग नसतात हे लगेच ध्यानात आले. जे साथीदार होते, तेच मारेकरी म्हणुन जीवावर उठले. जीव मुठीत धरुण देश सोडुन परदेशात आश्रय घ्यावा लागला. दक्षिण आशिया तीन अनेक देश पालथे घालुण शेवटी युरोपातील एका देशात आश्रय मिळाला. पण जीववरची भीती कमी झाली नाही!
आता व्यवसायात चांगला स्थिरावला होता. आशियातील अनेक देशांतुन वस्तु आणुन युरोपात विकण्याच्या व्यावसायात खुप प्रगती केली होती. आर्थिक दृष्ट्या संपन्न झाला होता. मध्यंतरी एक जीवनसाथी ही मिळाली होती अन दोन बछड्यांसह आयुष्य अगदी सुखात चालले होते...
पण असा एक दिवस येतो जेंव्हा 'आपल्या' कडचे कुणीतरी भेटते, अन मग जुन्या जखमा पुन्हा ताज्या होतात. जुने गाव पुन्हा आठवते. आई वडिल भाऊ बहिनी अन सर्वच जण नजरेसमोर दिसतात..... पण आता गाव हरवलेले असते अन त्याचे स्वप्न फक्त मनात घर करुन राहिलेले असते!
प्रसंग २:
युरोपातील एक प्रक्यात संशोधन संस्था. मी नुकताच पोस्ट डॉक्टरेट साठी तिथे रुजु झालेलो. पंचविसीतील एक जर्मन (!) तरुणी माझ्या लॅब ला पी एच डी साठी प्रवेश घेते. सुंदर, हुषार अन अभ्यासाव्यतिरिक्त कला, संस्कृती, खेळ यांत रस असणारी! दिवसाचेच नव्हे तर आठवड्याचे वेळापत्रक काटेकोर पणे आखलेले अन एक वेळ सुर्य उगवायचा विसरेल पण पॅट्रिशिया (तिचे नाव) वेळापत्रकातील वेळ चुकु देणार नाही. सोमवारी स्विमिंग, मंगळवारी स्पॅनिश भाषा, बुधवारी टेनिस, गुरुवारी लॅटीन नाच, शुक्रवारी फ्रेंच भाषा असा संशोधनाव्यतिरिक्त च्या वेळेतील भरगच्चा कार्यक्रम. शुक्रवार अन शनिवार फक्त कुटुंबाकरिता (तिचा जोडीदार त्याच शहरातील दुसर्या संशोधन संस्थेत पी एच डी करत होता)..!
आशियायी कुटुंबाचा अनुभव असेल तर पास्चात्य देशांत कुटुंब फारच कृत्रीम नाती असलेले वाटते. पण पॅट्रिशिया ला भारतीय/ आशियायी कुटुंब म्हटले कि स्वतःचे कुटुंब आठावायचे अन ती हळवी व्हायची.
ती दहा वर्षाची असताना पोलंड मधुन तिच्या आई वडिलांसह एका रात्री च्या खदतर प्रवासात ती जर्मन प्रदेशात आली. दहा वर्षाची असल्याने पोलंड मधील मुळ गावात तिच्या आठवणी तश्या कमीच होत्या, पण खेळातील सवंगडी, शेजारची काही कुटुंबे, सायकल शिकताना पदलेले दात, कुत्र्याचे पिल्लु! अन सर्वात महत्वाचे म्हणजे क्म्युनिस्ट तावडीतुन सुटुन स्वतंत्र जगात जाण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करणारे गावातील अनेक कुटुंबे!! एक प्रयत्न विफल झाला कि काही दिवस विश्रांती घेऊन पुन्हा नवीन जोडीदार शोधुन (मागच्या प्रयत्नातील अनेक जण मध्यंतरी तो विचार सोडुन देतात किंवा इतर मार्ग पत्करतात) तिचे आई वडिल संपुर्न कुटुंबाला जर्मन प्रदेशात घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत.
अन एक दिवस त्यांच्या प्रयत्नांना यश येते. एक मध्यरात्री पॅट्रिशिया ला नवा गांव मिळतो. तिथे ती लहानची मोठी होते. शाळा , कॉलेज, मित्र, मैत्रिणी भरपुर मिळतात. उच्च शिक्षणासाठी ती पुन्हा नव्या गावी येते..... नवनव्वीन देशातील मित्र भेटतात. त्यातील काही पोलंडचे ही असतात... अन जुन्या गावातील कोणी आहे का? अशी पुसटशी शंका मनात घेऊन ती त्याला गावाचे नाव विचारते! अजुन तिला कुणी तिच्या जुन्या गावातले कुणी भेटलेले नाही....पण तिने माघार घेतलेली नाही!!!
प्रसंग ३:
ऑस्ट्रेलियातील एक समुद्र किनारा. शुक्रवारी संध्याकाळी समुद्रावर फिरत असताना एक वृद्ध जोडपे बाकावर बसलेले दिसते. भारतीय असतील अशी शंका मनात ठेवुन मी हसतो. (इथे खुप भारतीय आहेत, त्यामुळे मी बरेचदा ओळख काढायचा प्रयत्न करतो, पण समोरची व्यक्ती मात्र पाहुण न पाहिल्या सारखे करुन निघुन जाते!) पन मग, ते जोडपेही ओळखीचे हसतात. मग मी पुधे जाऊन नमस्कार करतो अन बोलु लागतो. चक्क हिंदी भाषेत बोलु लागतात.(माझ्यासारखेच त्यांना ही मी बोलायला थांबलो म्हणुन आस्चर्य वाटते!.. पहिला धागा जुळतो.)
दोघे ही वयाची सत्तरी पार केलेले. केस रुपेरी पण मन तरुण. मुलगा मुलगी दोघे ही डॉक्टर अन सुखी संसारात जम बसलेले. प्रापंचिक काळजी काहीच नाही. मुळचे अखंड हिंदुस्थानचे! लाहोर जवळचे. (आता ते पाकिस्तानात गेलेले) लाहोर पाकिस्तानात गेले तेंव्हाच हे जोडपे अन अशी असंख्य 'विजातीय' जोडपी पाकिस्तानातुन बाहेर पडली. तरुण रक्त असल्याने आगीतुन वाचले, जे काही हाती लागले ते घेउन जीव मुठीत धरुन जन्मगाव सोडुन पळाले. जुन्या आठवणी ... अग्निकुंडात स्वाहा!
आफ्रिकेच्या अनेक देशां मध्ये नशीब आजमावुन शेवटी दक्षिण आफ्रिकेत महात्मा गांधींची पुण्यायी कामी येते. संसार चालु लागतो, मुले शिकतात. मग एक दिवस मुलांच्या आग्रहाखातर ऑस्ट्र्लियाला येणे होते. आता नोकरीतुनही निवृत्ती झालेली. मग असेच कुणी 'आपले' भेटतात का? म्हणुन फिरत राहतो. ओळख दाखवेल त्याला मनातले गाव दाखवायचे अन मनातच खुश व्हायचे! काही लोकांना किमान पुन्हा फिरुन जुण्या गावी जाण्याची शक्यता तरी आहे..पण ह्यांना तर गावच राहिला नाही! आता गांव फक्त स्वप्नात!
प्रसंग: ४
युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया ई प्रगत देशातील एखाद्या मोठ्या शहरातील सुख-सुविधांनी युक्त अश्या घरामध्ये बसलेला 'मी'!!! वयाची २०-२५ वर्षे भारतातील छोट्या छोट्या खेड्यांमध्ये घालवल्यानंतर उच्चा शिक्षण अन नंतर नोकरीसाठी गेली सात-आठ वर्षे अश्या मोठ्या मोठ्या देशातील मोठ्या मोठ्या शहरांमध्ये राहत आहे. अभ्यासाच्या काळात अभ्यास अन कामामध्ये इतका बुडलेला कि बाकी जगाचा विसर पडावा... आता अभ्यास संपुन ठराविक वेळेची नोकरी सुरु झाल्यावर मात्र, आसपास काय चाल्लेय? कसे चाल्लेय? अन मुख्य म्हंजे 'आपलं' कुणी आपलं दिसतय का? हे बघायला सुरुवात केलेली... माझ्या गावापेक्षाच नव्हे तर देशात पाहिलेल्या शहरांपेक्षाही वीज, पाणी तर मुबलक होते अन रस्ते ही आरशासारखे चकाचक होते. वा! मग, थोडे ओळखीचे चेहरे दिसल्यावर अजुन बरे वाटले....पण ती ओळख खुपच कृत्रीम आहे हे लक्षात आल्यावर मन खट्टु झालेले. रस्ते अन इमारती शी बोलता येत नव्हते अन ज्यांच्याशी बोलावेसे वाटत होते, ते माझ्याकडे पाहुण न पाहिल्यासारखे करत होते! जे दोन चार लोक ओळख देत होते, त्यांच्यातच मिळुन मिसळुन मजेत दिवस घालवत असतो! पन मनामध्ये मात्र 'गांव' आठवत राहतो. गांव हरवलेल्या माणसांमध्ये मीही सामील होतोय कि काय अशी भिती वाटायची!
अन मग असा एखादे दिवशी मग एकटा असलो कि तो श्रीलंकन मित्र आठवतो, ती जर्मन (!) पोलीश मैत्रीण आठवते, अखंड हिंदुस्तानात हरवलेल्या गावातले दादा-दादी आठवतात... मग मला ही माझा गाव आठवतो... तसा मी खुप शाळा शिकलेलो. खुप गावांत राहिलेलो. वडिल शिक्षक असल्याने दर दोन वर्षांनी बदलीच्या गावची नवी शाळा अन नवे मित्र मला मिळायचे. पुन:श्च हरिओम तर कित्येकदा केलेला. रस्ते, वीज, पाणी तर कित्येकदा नसायचे! पण त्यामुळे 'जगणे' काही थांबले नाही. आताशा अधुन मधुन गावाकडे गेलो कि त्यातही बरीच प्रगती झालेली दिसते! आपणही त्यात काही हातभार लावावा असे वाटते! परदेशातुन आलेले काही भारतीय आपल्या देशात काही नवे प्रकल्प सुरु करतात अशी उदाहरणे जेंव्हा स्वतः बघतो किंवा वृत्तपत्रांत वाचतो, तेंव्हा मनाला उभारी मिळते. आपल्या गावात नवे जग निर्माण करायला मी स्वतःच प्रत्यक्ष गावी जायला हवे असे काही नाही! दळणवळण अन दुरसंचारातील प्रगतीचा आधार घेतला तर दुर देशात राहुनही मी माझा गाव माझ्या स्वनांप्रमाणे सजवु शकतो! नव्हे तो मी सजवणारच असा एक विश्वास मनात येतो. मग मीही एक प्रयत्न करतो. दोन वर्षापुर्वी गावाकडे (बंधुंना सांगुन) दुध व्यवसायाची सुरुवात केली होती. खुप छान प्रतिसाद मिळाला. जवळपास चारशे कुटुंबाला त्याचा फायदा झाला. प्रकल्प छान चालल्याने त्यांचा आता अपेक्षा अजुन वाढल्यात! अन मलाही, आपल्याच 'गावात' आपण एक पुर्णपणे 'नवे जग' निर्माण करु शकतो हा आत्मविश्वास मनात दृढ झाला!!! श्रीलंकन मित्र, जर्मन मैत्रीण अन अखंड हिंदुस्थानी दादा-दादी पेक्षा माझे नशीब थोडे चांगले होते अन म्हणुन त्यांच्या सारखे 'गांव हरवलेला माणुस' झालो नाही याचा अतिशय आनंद झाला!
(मनोगतः माझ्या सारखे अनेक जण दुरदेशी वसलेले असतील. त्यांनाही त्यांचा गांव आठवत असेल. व्यावहारिक अन वास्तव अडचणींमुळे काही लोक पुन्हा गावाकडे नाही जावु शकत. पण दुरदेशातुन आपल्या गावात एक नवे जग निर्माण तर करु शकतात!! अशा समविचारी लोकांना एक व्यासपीठ मिळवुन दिले आहे ते 'ग्रंथाली प्रकाशन'' चे श्री. दिनकर गांगल साहेब ह्यांनी 'स्व.. देश' या श्री. भुषण केळकर यांनी संपादित केलेल्या पुस्तकाच्या रुपाने! परदेशात शिक्षण वा नोकरी निमित्ताने पाच-दहा वर्षे राहुन मग भारतात परत आलेली अन स्वतंचा व्यवसाय वा आवडीचे सामाजिक प्रकल्प सुरु केलेली २५ प्रातिनिधीक उदाहरणे त्यात दिलेली आहेत. 'स्व..देश' हे केवळ पुस्तक न राहता ती एक चळवळ झालीये अश्या समविचारी लोकांना एकत्र आणणारी अन दिपस्तंभाप्रमाणे मार्ग दाखवणारी! )
No comments:
Post a Comment